पुणे : पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी करुन गोदामातील प्रत्येक गाडीमागे १५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या संतोष उर्फ आण्णा देवकर व त्याच्या इतर ५ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली. दरम्यान, पुणे पोलिसांची सन २०२४ मधील ही तेरावी मोक्का कारवाई आहे.
अण्णा उर्फ संतोष किसन देवकर (वय – ३४, रा. अक्वा मॅजेस्टिक सोसायटी, फुरसुंगी), शेखर अनिल मोडक (वय २९, रा. वडकी गावठाण), साहस विश्वास पोळ (वय २५, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, वडकी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आणखी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळी प्रमुख संतोष उर्फ आण्णा देवकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन हिंसाचाराचा वापर केला. तसेच हिंसाचार करण्याची धमकी देऊन, धाक दडपशाही करून, जबरदस्तीने तसेच बेकायदेशीर कृत्य करत होता. याटोळीने मागील १० वर्षात खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे असे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली आहे. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करत आहेत.
सादर कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, तपास पथकाचे तेज भोसले, संदीप धनवटे, प्रशांत नरासाळे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.