पुणे : पुणे पोलिसांचा ‘मोक्का’ कारवाईचा धडाका सुरूच आहे. शहरात पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या अमित नाना चव्हाण आणि त्याच्या महिला साथीदारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. फिर्यादी महिला 7 फेब्रुवारीला चिंचवडगावाकडे जाणाऱ्या पीएमपीएमल बसने प्रवास करत होत्या.
त्यावेळी छत्रपती शिवाजी ब्रिजवर पुणे मनपा येथे अमित चव्हाण आणि त्याच्या महिला साथीदाराने फिर्यादी यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरने तोडुन पळ काढला होता. त्यावेळी प्रवाशांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊन तक्रार दिली होती. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून अमित नाना चव्हाण (वय-27 ससानेनगर, हडपसर, पुणे), नेहा बबन सोनवणे (वय-20 रा. ओटास्किम निगडी) यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1) (ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
आरोपी अमित चव्हाण याच्याविरुद्ध पुणे शहरामध्ये चोरी, जबरी चोरी, दरोडा, दुखापत करणे, हत्याराचा धाक दाखवुन लुटणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे करत आहेत. पुणे पोलिसांची चालु वर्षातील 15 वी मोक्का कारवाई आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार संतोष मेमाणे, रोहित झांबरे, दिलीप नागरे, नलीनी क्षिरसागर, स्वालेहा शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.