पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ राबविला आहे. मागील वर्षी सर्वाधिक गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली. आता चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या तीन सराफ व्यावसायिकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. याबरोबरच १२ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मात करत ‘मोक्का’ कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले.
गणपत जवाहरलाल शर्मा (वय ४४), दर्शन रमेश पारेख (वय ३२) आणि सुरजभान सिद्धराम अगरवाल (वय ७८, तिघे रा. खडकी) अशी कारवाई केलेल्या सराफ व्यावसायिकांची नावे आहेत. वाकडमधील टोळी प्रमुख रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (वय २८), चाकणमधील शुभम युवराज सरोदे (वय २१), निगडीतील आरोपी मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबूब कोरबू (वय २८), पिंपरीतील प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (वय ३०), आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (वय २६), सांगवीतील आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (वय १९), अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (वय २५), निगडीतील लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (वय १९), भोसरीतील अक्षय नंदकिशोर गवळी (वय २८), चिखलीतील मन्नू ऊर्फ अतिष बलदेव कोरी (वय २१) हे सर्व टोळी प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
स्वत:चे गुन्हेगारी वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. टोळी प्रमुख म्हणून धाक दपटशहा दाखवून टोळी प्रमुख व साथीदारांनी खून, खूनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी, अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे, तोडफोड करणे, विनयभंग, अपहरण, खंडणी, दरोडा, दंगा करणे, अश्लिल वर्तन करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा घातक शस्त्रे जवळ बाळगणे, असे अनेक गंभीर गुन्हे या सर्वांवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
२०२३ मध्ये ५१ टोळ्यांतील ३५७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन झाल्यापासून मागीलवर्षी सर्वाधिक गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली.