पुणे : पुण्यातील वारजे माळवाडीतील पटेकर टोळीवर ‘मोक्का’ कारवाई करण्यात आली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना वीट मारून जखमी केले, तसेच तेथे जमलेल्या लोकांना शिवीगाळ करत हत्यारे उगारून दहशत निर्माण करणाऱ्या गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर आणि त्याच्या अन्य ६ साथीदारांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. चालू वर्षातील ही मोक्काची १६ वी कारवाई आहे.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून अमरजित मुन्ना सिंग (२३), रोहन अनिल चव्हाण (२५), शुमवेल ऊर्फ दाद्या बाबूराव गायकवाड (३०, तिघेही रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना अटक केली आहे. टोळी प्रमुख गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर याच्यासह इतर ४ जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबबत अधिक माहिती अशी की, टोळी प्रमुख गणेश पटेकर याने गुन्हेगारांची टोळी तयार करून अपराध केले आहेत. आरोपींनी खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अपहरण, जबरी चोरी, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत.
पटेकर टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्यावतीने अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काच्या कारवाईस मंजुरी दिली. अधिक तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त भीमराव टेळे हे करत आहेत.