पिंपरी: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का ) अंतर्गत भोसरीमधील जगताप टोळीवर कारवाई केली आहे. टोळीप्रमुख आदर्श उर्फ कुक्या गोविंद जगताप (वय २२, रा. आदर्शनगर, मोशी), सुनील राणोजी जावळे (वय २६, रा. आदर्शनगर, मोशी), रोहित उर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (वय १९, रा. आळंदी रोड, भोसरी) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे केल्याची माहिती समोर आली. जगताप टोळीतील आरोपींवर भोसरी, दिघी, वाकड आणि पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जगताप टोळीमधील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सन १९९९अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव भोसरी पोलिसांनी पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला. त्यानंतर पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोक्काअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील आठ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ३९ आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्याच्या हेतूने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे ठोस पाऊल उचलत असल्याने शहरात ‘चौबे पॅटर्न’ बघायला मिळत आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ एक) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, उपनिरीक्षक श्री शेख, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली आहे.