लोणी काळभोर, ता.२६ : पुणे शहरात गणेशोत्सवाच्या कालावधील गर्दीचा फायदा घेऊन सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांनी मंगळवारी (ता.२६) अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ५२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारभावात सुमारे १६ लाख रुपये किंमत असल्याची माहिती देण्यात आली.
शामकुमार संजय राम (वय २५), विशालकुमार गंगा महातो (वय २१), बादलकुमार मोतीलाल महातो (वय २५), विकीकुमार गंगा महातो ऊर्फ बादशाह नोनीया (वय १९, सर्व रा. तिनपहाड, जि. सायबगंज, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गोपी महातो व राहूल महातो (दोघेही रा. तिनपहाड, सायबगंज, झारखंड) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान अधिक गर्दी असते. या गर्दीत नागरिकांचे मोबाईल चोरी जाण्याचे प्रकार हडपसरसह परिसरात मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रवींद्र शेळके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते. तसेच पथकाला गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास करत असताना शोध पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी उन्नतीनगर येथील कॅनोलजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून या चार आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी पुणे शहरात हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत व इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांची घरझडती घेतली असता त्यांच्या घरातून ४० मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.