शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण परिसरात खड्ड्यात अडकलेली कार काढून देण्याच्या बहाण्याने एका बँकेच्या शिपायाच्या कारमधील रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. शिक्रापूर येथील सान्वी सोसायटी जवळून बँक ऑफ महाराष्ट्र पिंपरखेड शाखेचे शिपाई श्रीहरी काळे हे त्यांच्या ताब्यातील कारमधून कुटुंबियांसह जात असताना सान्वी सोसायटी जवळ त्यांची कार ड्रेनेजच्या खड्ड्यात अडकली.
यावेळी काळे यांनी शेजारील लोकांना मदतीला बोलावले असता चार पाच इसम मदतीला आहे, दरम्यान एका इसमाने कार चालवून तर अन्य इसमांनी कार ढकलून खड्ड्यातून बाजूला घेतली. त्यांनतर कार घेऊन जात असताना कार मध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये व १ मोबाईल नसल्याचे काळे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी परत येऊन येथील इसमांचा शोध घेतला, मात्र इसम मिळून आला नाही. याबाबत श्रीहरी गोपाळ काळे (वय ३८ रा. टाकळी हाजी ता. शिरुर) पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस नाईक बापू हाडगळे हे करत आहे.