पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यात १३ जानेवारीला (आज) पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. मनसेचे राज्यात सुमारे ३ हजार सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
त्यांपैकी कितीजण मेळाव्याला हजर राहतात, हे पाहून महत्वाचं ठरणार आहेत. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, बाबू वागसकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने काही ग्रामपंचायतींची सत्ता मिळविली असली, तरी सरपंच आणि सदस्य संख्या सुमारे एक हजाराच्या आसपास असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर निदर्शनास आले होते. मात्र ही संख्या २ हजार ८०० ते ३ हजारांच्या आसपास असल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे.