पुणे : राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आज २७ फेब्रुवारी रोजी शरद पवार पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला गेले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांच्या बैठका सुरू आहेत.
अशातच मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. या पूर्वी वसंत मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात बारामती लोकसभेसाठी शरद पवार वसंत मोरेंची मदत घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वसंत मोरे यांचे तुतारी वाजवून स्वागत
वसंत मोरे हे राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचे समजले जातात. मशिद भोंगे प्रकरणावर वसंत मोरे यांनी स्वत:ची भूमिका मांडली होती. पण आपण कधीच मनसे सोडणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. शरद पवारांच्या भेटीला गेलेले वसंत मोरे यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी रायगडावर तुतारी चिन्हाचे अनावरण केलं.
त्यानंर ४० वर्षानंतर शरद पवारांना रायगडाची आठवण झाली. ते कधीच आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत नाहीत. मुस्लिम मते जातील, असे त्यांना वाटते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची भेट महत्वाची मानली जात आहे.