केडगाव : खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे दौंड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्या थांबवता येतील, असे वेळापत्रक तयार करण्यात यावे याबाबत निवेदन दिले आहे. तसेच बुधवारी कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे रेल्वे मंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन दौंड ते पुणे रेल्वे प्रवासात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय रेल्वे सल्लागर समितीचे सदस्य ॲड. कृपाल पलूसकर हे देखील उपस्थित होते.
यावेळी दौंडला पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करून पुणे ते दौंड दरम्यान मेमू व डेमू ऐवजी ईएमयु (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) चालवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच दौंड ते हडपसर डेमू ही पुण्यापर्यंत करण्यात यावी. पुणे ते दौंड दरम्यानच्या सर्व रेल्वे गाडया वेळेवर सोडाव्यात. पुणे ते दौंड दरम्यान तिकिट दर हे मेल एक्सप्रेसचे आहेत, ते पूर्वी प्रमाणे आकारण्यात यावे. दौंड- पुणे आणि पुणे-तळेगाव लोकल या समोरासमोर फलाटावर घेण्यात येऊन कनेक्ट करण्यात यावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या.
या सर्व मागण्या आणि अडचणींबाबत पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.
दौंडला उपनगर (सबअर्बन) झोन म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठी पुणे रेल्वे मंडळ व मध्य रेल्वे मुख्यालय यांच्याद्वारे रेल्वे बोर्डकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जेव्हा रेल्वे बोर्डद्वारे दौंडला पुण्याचे उपनगर (सबअर्बन) म्हणून घोषित करण्यात येईल. तेव्हाच पुणे ते दौंड लोकलसेवा ही सुरु होईल. दौंडला पुण्याचे उपनगर घोषित करण्यासाठीची ही बाब रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे .
म्हणून आता प्रवाशांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की रेल्वेबोर्ड दौंडला पुण्याचे उपनगर (सब अर्बन झोन) म्हणून कधी घोषीत करेल. तसेच आमदार, खासदार, मंत्री, राजकीय प्रतिनिधी यासाठी काही पाठपुरावा करतील का नाही ? गेले चाळीस वर्षे दौंड ते पुणे रेल्वे प्रवासी पुणे लोकलसाठी दौंडला उपनगर म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. सध्या पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पुणे ते दौंड दरम्यान असणाऱ्या लोकल डेमू गाडयाची संख्या ही बोटावर मोजण्याएवढी आहे. त्या देखील वेळेवर चालत नाही. पुणे ते दौंड मार्गावर डीझेल लोकल गाडी गती घेण्यास वेळ लावते व स्टेशनवर आल्यावर दोन्ही इंजिनमध्ये डिझेल भरण्यासाठी साधारणतः २० मिनिटे घेते. त्यामुळे पुणे-दौंड मार्गावर इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) ही कधी सुरु होईल हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
– प्रमोद ज्ञानदेव शेलार, प्रवाशी, खुटबाव- देलवडी