लोणी काळभोर : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा व शेवाळवाडी येथील उद्योजक सतीश साधबा वाघ (वय 55) यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना फुरसुंगी रस्त्यावरील आकाश लॉन्स जवळ सोमवारी (ता.9) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हडपसर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. तर ते कुटुंबासोबत शेवाळवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील फुरसुंगी फाटा परिसरात राहतात. सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. 9) सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉकला चालले होते.
दरम्यान, सतीश वाघ हे आकाश लॉन्स जवळ आले असता, तेव्हा एका गाडीतून आलेल्या अनोळखी इसमांनी त्याचे अपहरण केले. व गाडीच्या डिकीत डांबले. त्यानंतर अपहरण कर्त्यांनी गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेकडे गेल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच, हडपसर पोलीस व पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून आरोपींच्या मार्गावर आहेत.