जीवन सोनवणे
भोर, ता.२० : भोर तालुक्यात अनेक प्रशासकीय विभाग आहेत. त्यातील काही प्रशासकीय विभागाचे अधिकारी कायमच काम चुकारपणा करून गैरहजर असतात. याचा परिणाम शासकीय कामकाजावर होऊन नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नागरिकांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. अशा सूचना देत कामचूकार अधिकाऱ्यांची आमदार संग्राम थोपटे यांनी चांगलीच कानउघडणी केली.
भोर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची समन्वय आढावा बैठक आमदार थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२०) पार पडली .यावेळी आमदार थोपटे बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे,माजी जी. प.सदस्य विठ्ठल आवाळे,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, अण्णासाहेब घोलप यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीत वेगवेगळ्या विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. बहुतांशी विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले तर काही विभागाच्या अधिकाऱ्यांना कामकाजाबद्दल सूचना देऊन कानउघडनी केली गेली. तर भोर तालुक्यातील रस्त्यांची चालू कामे त्वरित करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.