पुणे : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठीची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघडी असा सामना होणार आहे. तसेच तिसऱ्या आघाडीची फक्त चर्चा असून अद्याप त्याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ‘पुणे प्राईम न्यूज’ने एक सर्व्हे केला असून लोकांची आमदार म्हणून कोणाला पसंती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण पुरंदर मतदारसंघात केलेल्या सर्व्हेची आकडेवारी जाणून घेणार आहोत…
‘पुणे प्राईम न्यूज’ने केलेल्या सर्व्हेमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप हे आघाडीवर आहेत. तर दुसऱ्यास्थानी गंगाराम जगदाळे आहेत. माजी मंत्री असलेले विजय शिवतारे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. चौथ्या क्रमांकावर संभाजीराव झेंडे हे आहेत. आमदार संजय जगताप यांना ४७ टक्के मतदारांनी आपल्या मनातील भावी आमदार म्हणून पसंती दिली आहे. त्याखालोखाल गंगाराम जगदाळे यांना २६ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे २१ टक्के, तर संभाजीराव झेंडे यांना ६ टक्के मतदारांनी कौल दिला आहे. या सर्व्हेमध्ये एकूण तीन हजार दोनशे मतदारांनी आपला सहभाग नोंदवला.
आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार संजय जगताप आणि माजी विजय शिवतारे या दोघांमध्ये प्रमुख लढत होईल, असे मानले जाते होते. परंतु, शिवतारे यांना मागे टाकत गंगाराम जगदाळे यांनी आघडी घेतली आहे. त्यामुळे शिवतारे यांना आगामी निवडणुकीत विरोधकांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, असे प्रथम दर्शनी दिसत आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवतारेंचा २५ ,००० मतांनी पराभव केला होता.
‘पुणे प्राईम न्यूज’ने केलेल्या सर्व्हेमध्ये आताच्या घडीला विद्यमान आमदार संजय जगताप हेच पुन्हा बाजी मारतील, असे चित्र आहे. आमदार जगताप यांना गंगाराम जगदाळे यांचे कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अजूनही दोन महिन्यांचा वेळ बाकी असल्याने आगामी काळात हे चित्र बदलले देखील जाऊ शकते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालादिवशीच आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे समजणार आहे.
‘पुणे प्राईम न्यूज’ करणार पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पुणे प्राईम न्यूज’ पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे करणार असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा संपूर्ण सर्व्हे पाच सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.