पुणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर आणि हवेलीच्या जनतेसह लोकप्रतीनिधींचा अपमान केल्याचा आरोप आमदार संजय जगताप यांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिगृहावरती पुरंदर आणि हवेली तालुक्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीची माहिती मिळताच आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, तरी देखील शिंदे यांनी ही बैठक घेतली. यावरून आमदार संजय जगताप चंगलेच आक्रमक झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजित आमसभेमुळे सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आमदार जगताप यांच्या विनंतीला मान न देता माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक घेतली. त्यामुळे संजय जगताप आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या आणि हवेली तालुक्यातील जनतेचा अपमान केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींचा देखील अपमान केला असल्याची टीका आमदार संजय जगताप यांनी केली.