सासवड : पुरंदर तालुक्यात असलेल्या रेशीम केंद्राची नव्याने उभारणी, शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे व नव्याने उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नांतून सुमारे १ कोटी ६६ लाख ३४ हजार रुपये खर्च करून याची उभारणी करण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदिप पोमण, महिला अध्यक्ष सुनीता कोलते, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील तुती उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना अधिक फायदा होण्यासाठी या केंद्राचा उपयोग होणार असुन त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज स्वरूपात मदत करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षात याची उभारणी करून येवल्याच्या पैठणी प्रमाणेच पुरंदरच्या साडी, धोतर यांचा ब्रँड बाजारात येईल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.