सासवड : जलजीवन योजनेची कामं होत असताना अनेक ठिकाणी ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याचे आढळून आले आहे. वास्तविक ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखालीच ही योजना चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत ठेकेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी किंवा प्रतिनिधींची बैठक झाली पाहिजेत. त्यांनी गावातील कामाचा डी पी आर ग्रामपंचायतीत दिला पाहिजे, समन्वय साधूनच कामे झाली पाहिजेत, प्रत्येक वाडी – वस्तीवरील घरात पाणी आले पाहिजे, हा मुख्य उद्देश ठेऊन स्थानिकांनीही लक्ष देणे आवश्यक असल्याचे आवाहन पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
सासवड येथे सोमवारी (दि. २२) पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक् सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील कामांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, नंदूकाका जगताप यांसह जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या आढाव्यात नागरीकांतून ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. एमजीपीचे ठेकेदार आणि ग्रामपंचायत समन्वय नाही, पाण्याच्या साठवण टाक्यांच्या जागांच्या अडचणी, जलवाहिन्यांची अर्धवट कामे पूर्ण करणे, वाढीव प्रस्ताव करणे, विहीरी, विजजोड, योजनेची संथगतीने सुरू असलेली कामे आदींबाबत उपस्थित ग्रामसेवक तसेच पदाधिका-यांनी तक्रारी केल्या. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत सुचना आमदार संजय जगताप यांनी दिल्या.
प्रत्येक वाडी-वस्तीवरील पाईपलाईन व वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करून प्रत्येक घरात नळाने पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. सर्व पाईपलाईन नवीन करा. वीर वरून पाणी आणून दोन मोठे साठवण तलाव करून पाणी पुरवठा करावा. ठेकेदारांसाठी योजना करू नका, जनतेला पाणी मिळत नसेल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. प्रादेशिक योजनांच्या गावांत मोठे दुर्लक्ष आहे. अशा सुचना माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे यांनी केल्या.
प्रादेशिक अंतर्गत गावांसाठी स्वतंत्र बैठक
ही योजना होत असताना आधिच्या प्रादेशिक योजनांच्या पाण्याच्या टाक्या, जलवाहिनींचा वापर होताना दिसत आहे. मात्र या योजना जुन्या झाल्या असून या योजनेंतर्गत गावांसाठी नवीन जलवाहिन्या तसेच पाणी साठवण टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र करणे आवश्यक आहे. पारगाव – माळशिरस, शिवरी प्रादेशिक योजनांतर्गत गावांसाठी होणाऱ्या स्वतंत्र बैठक घेऊन या गावांतील कामांसाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याबाबत आमदार संजय जगताप यांनी सुचना दिल्या.