पुणे : राष्ट्रावादीचे नेते शरद पवारांच्या भेटीनंतर कसबा पेठ मतदार संघाचे आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे महापालिकेत जात आयुक्तांची भेट घेतली आहे.पुणेकराचे प्रश्न विधानसभेत मांडणार आहे. पुण्यात टॅक्सचा प्रश्न मोठा आहे. मी त्यासंदर्भात आज आयुक्तांची भेट घेतली. असे आमदार धंगेकरांनी यावेळी माध्यमांना सांगितले.
ते म्हणाले की, ‘पुण्यात टॅक्स इतका आहे की लोक राहण्यास तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. ते सगळं आम्ही आयुक्तांना सांगितले आहे. सध्या आम्ही विरोधात बसलोय पण लवकरच आम्ही सत्तेत येणारच असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी कसबा निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर मी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यांच्या शेजारी उभं राहायला मिळणं हीदेखील माझ्यासारख्या माणसासाठी मोठी गोष्ट असते. शरद पवार जेव्हा एखादा शब्द बोलतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ निघतात असेही धंगेकर यांनी सांगितले.
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आमदारीकीची जागा रिक्त झाली होती. त्या ठिकाणी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. १० हजार ५०० मतांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर हे नाव चांगलंच चर्चेत आहे.
पुणेकरांच्या टॅक्सचा प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने धंगेकर हे पुणे महापालिकेत आले होते. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नी काही मार्ग काढता येईल का? याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आम्ही आत्ता विरोधात आहोत पण २०२४ मध्ये सत्तेत येऊ असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.