पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एन. शिंदे. यांच्या कोर्टाने अटी व शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीला १२ लक्ष लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे आशानगर, वैदुवाडी, गोखलेनगर पुणे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ६० लक्ष लिटर्स क्षमतेच्या पाण्याचे टाकीचे उद्घाटन वैदुवाडी, पुणे येथे करण्याचे पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
पुणे महापालिका यापूर्वीचा सर्वसाधारण सभेचा ठराव अस्तित्वात असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी अचानक अजित पवार यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीला पाण्याच्या टाक्यांचं लोकार्पण करण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी रवींद्र धंगेकर यांनी याला विरोध दर्शवला होता. आमदार धंगेकर व काँग्रेसचे काही नेते व कार्यकर्ते पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यासाठी जमले. त्यावेळी मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन गोंधळ घालत होते. तेव्हा धंगेकर यांनी पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ केली होती. त्यानंतर २९ जानेवारीला फिर्यादींनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आमदार रवींद्र धंगेकर यांनी ॲड. नितीन भालेराव यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आरोपी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून आमदार धंगेकर यांना जिल्हा व सत्र सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.