पुणे: कैद्यांची बडदास्त ठेवणारे ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार, पोलिस प्रशासन यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तालयासमोर नुकतेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी धंगेकर यांनी वरील प्रतिपादन केले आहे. यावेळी गोपाळ तिवारी, प्रवीण करपे, राजू नाणेकर, सुरेश जैन, प्रशांत सुरसे, गोपाळ आगरकर, सुरेश कांबळे, संदीप मोरे, ऋषिकेश बालगुडे, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, राकेश नामेकर, गौरव बाळंदे, रिपब्लिक संघर्ष दलाचे संजय भिमाले आणि जयहींद संघटनेचे अध्यक्ष सुनील नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले कि, अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी अद्याप हाती घेण्यात आली नाही. सरकारने या प्रकरणाकडे गंभीरतेने पहाणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना अद्याप अटक केली नाही. मात्र, पैशांची देवाण घेवाण करणारा त्यांचा सहकारी कर्मचारी महेंद्र शेवते याला आम्ही आंदोलन इशारा दिल्यावर अटक केली आहे.
ललित पाटील प्रकरणात सर्व दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी हवे तेवढे लक्ष घातले नाही. त्यांनी लक्ष घातले असते तर, पोलिसांनी वेळेवर तपास केला असता आणि आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. ललित पाटील हा लपूनछपून नव्हे तर उघड उघड ससून मधून ड्रग्जचा धंदा करत होता. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये पोलिसांना, सरकारी अधिकारी, डॉक्टरांना दिले आहेत. म्हणूनच संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असेही धंगेकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, आमदार धंगेकर यांच्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगली धावपळ उडाली होती. अखेर पोलिस आयुक्तांनी धंगेरकांना आश्वस्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.