गणेश सुळ
केडगाव : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांच्या विजयासाठी दौंडमधील कट्टर विरोधक आमदार राहुलदादा कुल आणि माजी आमदार रमेशअप्पा थोरात यांचे एकत्रित फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदार आणि नेते काय करणार? याचा अंदाज बांधला होता. मात्र, विद्यमान आमदार राहुल कुल आणि माझी आमदार रमेश थोरात हे एकाच व्यासपिठावर एकमेकांशी बोलत असल्याचे फोटो पाहून आपला अंदाच बरोबर की चुकीचा असा प्रश्न दौंडच्या जनतेला पडला आहे.
दौंड तालुक्यातील राजकारणाचा कणा हा बारामतीकरांच्या राजकीय प्रवाहात कणखर बनलेला आहे, यातून तालुक्यात विद्यमान आमदार राहुलदादा कुल आणि माजी आमदार रमेशअप्पा थोरात असे दोन गट तयार झाले आहेत. बारामतीकरांच्या राजकीय प्रवाहातून या दोघांच्या राजकारणाची सुरुवात झाली असून ते राज्यभर परिचित आहेत. मागील काळामध्ये पवारांशी फारकत घेऊन कुल आणि थोरात हे दोघेही वेगळ्या पक्षात गेले.
रमेश थोरात परत स्वगृही परतले आणि कुल यांनी एकदा राष्ट्रीय समाज पक्ष आणि नंतर भाजपा असा प्रवास करत ते आता भाजपाचे विद्यमान आमदार असून जिल्ह्यातील भाजपचे वजनदार नेते आहेत. दोघांच्याही राजकारणाची सुरुवात शरद पवार यांच्या विचाराने झाली आहे.
1990 साली विद्यमान आमदार राहुल कुल यांचे दिवंगत वडील सुभाष कुल यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला. या विजयात सर्वाधिक वाटा आता आमदार राहुल कुल यांचे कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार रमेश थोरात यांचा होता. अपक्ष निवडून आलेले सुभाष कुल हे शरद पवारांच्या सहवासात गेले आणि तिथून पुढे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
सध्या अजित पवार भाजपाचे मित्र आहेत, त्यामुळे कुल यांना त्यांचे काम करावे लागणार आहे. रमेश थोरात आणि राहुल कुल यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर असूनही या निवडणुकीत रमेश थोरात अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून प्रचार करतील आणि त्यांच्याच बरोबर कुल यांना प्रचार करावाच लागेल. शेवटी बारामतीकरांच्याच विजयासाठी कुल आणि थोरात या कट्टर विरोधकांना काम करावे लागेल अशी परिस्थिती आहे.