केडगाव: दौंड शहरात मागील काही दिवसांत झालेल्या पावसात नगरपालिकेची ड्रेनेज व्यवस्था कुचकामी ठरली होती. त्यामुळे दौंड शहरातील व व्यापार पेठेतील गटार तुंबल्याने गटारीतील पाणी शहरातील रस्त्यांवरून वाहू लागले व पाणी काही व्यापाऱ्यांच्या दुकानात देखील शिरले. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.
तसेच दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भंगाळे हॉस्पिटल परिसर व पाणी साठलेल्या सर्व ठिकाणी आमदार राहुल कुल यांनी भेट देत व्यापारी वर्गाच्या व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना या परिस्थितीतून कशाप्रकारे मार्ग काढता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. सदरची कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत देखील कार्यवाही करण्याचे आदेश आमदार राहुल कुल यांनी दिले.
यावेळी दौंडचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक संतोष डोके, जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया, योगेश कटारिया तसेच नगरपालिकेचे अधिकारी, भाजपा व नागरिक हित संरक्षण मंडळ व आरपीआयचे नगरसेवक व कार्यकर्ते आणि व्यापारी उपस्थित होते.