यवत : दौंड तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून चर्चा केली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
याबाबत आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये मागील 10 ते 15 दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात उडणारे ड्रोन हे नागरिकांच्या काळजीचा व चिंतेचा विषय बनत चालला आहे. हे ड्रोन हेरगिरी करीत आहेत काय असा संशय नागरिकांच्या मनात येत असून, यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. आकाशात उडणारे हे ड्रोन काल परवा रात्रीच्या वेळी आमदार राहुल कुल यांच्या देखील निदर्शनास आले असून, याची चौकशी करून बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार राहुल कुल यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत रात्रीच्यावेळी अचानक दिसणाऱ्या ड्रोन प्रकरणाबाबत पुणे ग्रामीण पोलीसांकडून तांत्रिक विशेषज्ञ यांची मदत घेण्यात येणार आहे.
काही दिवसांपासून बारामती, सुपा, यवत, दौंड, भिगवण परिसरात रात्रीचे वेळी अचानक ड्रोन दिसत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. ड्रोन दिसल्याने अनेक अफवा नागरीकांमध्ये पसरल्याने अचानक दिसणारे हे ड्रोन नक्की काय प्रकार आहे, याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
ड्रोन मुळे निर्माण झालेल्या अफवा तसेच नागरीकांमधील भितीचे वातावरण यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांकडून विशेष तज्ञाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने पत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आली.
बारामती, सुपा, वडगाव निंबाळकर, यवत, दौंड, भिगवण परिसरात ड्रोन आढळून आले तर नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. बारामती शहर पो.स्टे 02112-224333), सुपा पो.स्टे 02112-202033, वडगाव निंबाळकर पो.स्टे 02112-272133, दौंड पो.स्टे 02117- 2623 २६२३३३, यवत पो.स्टे ०२११९-२७४२३३ यावर तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण 020-25657171, 25657172 येथे संपर्क करावा. रात्रीच्यावेळी दिसणा-या ड्रोन मुळे नागरिकांनी भयभीत होवू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने करण्यात येत आहे.