पुणे : दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे, पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी, दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलदगतीने सुरु करावे, आदी मागण्यांचे निवेदन या वेळी रेल्वे मंत्र्यांना देण्यात आले.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांना आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :
* खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा.
* कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत.
* दौंड-पुणे मार्गादरम्यान मेमू ट्रिपची वारंवारता वाढवावी , ०१५२२/दौंड-हडपसर डेमू विशेष गाडी पुण्यापर्यंत चालवावी.
* हडपसर-सोलापूर डेमू एक्सप्रेसला मांजरी, यवत, खुटबाव, कडेठाण आणि पाटस स्थानकांवर थांबा मंजूर करावा.
* छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी)- सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन येथे थांबा देण्यात यावा.
* दौंड-पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमू लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत.
* चेन्नई सेंट्रल एसएफ एक्सप्रेस, मुंबई-कोईम्बतूर एक्सप्रेस, सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, विशाखापट्टणम एक्सप्रेस, कराईकल साप्ताहिक एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस, होसापेटे एसएफ एक्सप्रेस, यशवंतपूर एसी एक्सप्रेस, चेन्नई सेंट्रल हमसफर एक्सप्रेस आदी सुपर फास्ट लांब पल्ल्याच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा द्यावा.
* वाढती लोकसंख्या व नागरीकरण लक्षात घेता पुणे-दौंड रेल्वे ट्रॅकचे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळीच्या मध्ये सहजपूर, उरुळी आणि लोणीच्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसरच्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी.
या भेटीप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. अश्विनी वैष्णवजी यांनी आमदार राहुल कुल यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.