केडगाव: नानगाव (तालुका दौंड) येथे ३० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार कुल म्हणाले की, प्रांत कार्यालय, क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा न्यायालय, पोलीस स्टेशन इमारत, नाट्यगृह ही विकास कामांची उदाहरणे आहेत. वाघोली- राहु- पारगाव- यवत या रस्त्यासाठी ७५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०१९ मधील बारामती लोकसभा निवडणुकीच्या लढतीची दखल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. त्यामुळेच आपण आपली ओळख दिल्लीपर्यंत करू शकलो. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये दौंड तालुक्याला मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणता आला, असे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले.
खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध असताना देखील दोन अवर्तने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपला दौंड तालुका हिरवागार राहण्यास मदत होईल. तसेच भविष्यात मुळशी धरणातील पाणी दौंड तालुक्यात आणण्यासाठी व आर्थिक मदतीसाठी 9 देशाच्या प्रतिनिधींनी नुकतीच भेट दिली आहे. 7 ते 9 टीएमसी पाणी लवकरच दौंड तालुक्यासाठी उपलब्ध करू, जेणेकरून पाणी टंचाई दूर होईल, असं देखील आमदार कुल यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी उपसरपंच संदीप पाटील खळदकर यांनी केले .यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार राहुल कुल यांच्या दूरदृष्टीमुळे अष्टविनायक मार्ग नानगावमधून गेला. त्यामुळे नानगावचा चेहरा मोहराच बदलला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी विकास खळदकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार कुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
अॅड. अशोक खळदकर, भीमा पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, राजकुमार मोटे, सचिन शिंदे, निर्जला गुंड, प्रा.सचिन वळु यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सरपंच स्वप्नाली शेलार, उपसरपंच सचिन शेलार, पोलिस पाटील पोपट लव्हे, वडगावचे सरपंच सचिन शेलार, माऊली ससाणे, विठ्ठल गुंड, नंदकिशोर गुंड, मनोहर गुंड, संभाजी खळदकर, प्रा. वासुदेव गुंड, सचिन गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्या कुल कुटुंबाने एकूण ८ विधानसभा निवडणुका लढवल्या. तसेच पक्षनिष्ठा राखत १ लोकसभा निवडणूक लढवली. २०१९ मध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार मते मिळाली. या निवडणुकीमध्ये पराभव झाला असला तरी आपण जी लढत दिली, त्याची चर्चा दिल्लीपर्यंत रंगली. त्यामुळेच आपण दौंड तालुक्यासाठी जास्त निधी मिळवू शकलो
राहूल कुल – आमदार, दौंड विधानसभा