यवत: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची धडक झाल्याची घटना भांडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत आज गुरुवारी (ता.२३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघात झाल्यानंतर दुचाकींवरील ४ परप्रांतीय कामगार रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. तेव्हा या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल त्वरित गाडीतून खाली उतरले आणि जखमीच्या मदतीला धावून गेले. जखमी कामगारांना स्वत: दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे आमदार राहुल कुल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राहुल कुल हे त्यांच्या कामानिमित्त यवतवरून पुण्याच्या दिशेने चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना त्याची गाडी भांडगाव जवळ आली असता, महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चारही कामगार रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले. ही घटना आमदार राहुल कुल यांनी पाहिल्यानंतर ताबडतोब चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. आमदार कुल गाडीतून खाली उतरत त्वरित जखमी कामगारांच्या मदतीला धावून गेले.
आमदार कुल यांनी जखमी कामगारांची विचारपुस केली. तसेच त्यांना रुग्णवाहिकेमध्ये बसवून पुढील उपचारासाठी यवत (ता. दौंड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविले. तसेच संबंधित डॉक्टरांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या चारही कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, माझ्या चालकाला आणि अंगरक्षकाला सांगूनच ठेवलं आहे की, मी गाडीत झोपलो किंवा इतर कामात मग्न असलो तरी रस्त्यात एखादा अपघात झालेला दिसला, तर लगेच गाडी थांबवा. जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यास मदत करा. शेवटी जीव वाचणं महत्त्वाचं आहे! रुग्णालयात थोडा उशीर होईल, जबाब नोंदवावा लागेल, हॉस्पिटलमध्ये सह्या कराव्या लागतील, याचा विचार करू नका, असे आमदार कुल यांनी सांगितले.
आमदार कुल यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जखमींना त्वरित उचार मिळाले आहेत. तसेच आमदार कुल यांनी स्वत: लक्ष देऊन जखमींना मदत केली आहे. त्यामुळे आमदार कुल यांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहचविण्यासाठी विनामुल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल यवत येथील दत्त रुग्णवाहिका सेवा व संदीप दोरगे यांचे आमदार कुल यांनी आभार मानले.