पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. निलेश लंके यांनी कोरोना काळातील आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मात्र, आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं असलं तरी आज त्यांनी पक्षप्रवेश करणं टाळलं आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी निलेश लंकेंच्या प्रवेशावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सविस्तर भाष्य केले होते. “निलेश लंकेंनी कोणतीही चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांची आमदारकी जाईल”, असा इशारा अजित पवार यांनी निलेश लंके यांना दिला होता.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे. या यादीत खासदार सुजय विखे पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. सुजय विखे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, सुजय विखेंविरोधात तगडा उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडी करत आहे. सुजय विखेंविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्यामागे लोक उभा राहू शकतात. शिवाय त्यांचा असणारा दांडगा संपर्क फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष- शरद पवार निलेश लंके यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.