पिंपरी: भोसरी विधानसभा मतदारसंघातील पावसाळापूर्व कामे आगामी आठ दिवसांत मार्गी लावा. रस्ते खोदाई नियमावलीची कठोर अंमलजावणी करावी. तसेच नागरी आरोग्याच्या दृष्टीने साथीचे रोग प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशा सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका फ-क्षेत्रीय कार्यालयात पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी स्थापत्य विभागाचे मुख्य शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह फ-क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, स्थापत्य, आरोग्य, उद्यान, वैद्यकीय आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
भोसरी मतदारसंघातील चिखली गावठाण, पाटीलनगर, मोरेवस्ती, घरकुल, कृष्णानगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण, रुपीनगर, सहयोगनगर, शिवतेजनगर आदी परिसरातील पावसाळा पूर्व कामे आणि प्रलंबित विकासकामे याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नालेसफाई, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, रस्ते खोदाई नियमावलीची अंमलबजावणी, वृक्ष छाटणी, धोकायदायक वृक्ष हटवणे यासह आपत्ती व्यवस्थापन आदी विविध मुद्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. आगामी आठ दिवसांत रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करावीत, तसेच पथदिवे आणि साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध फवारणी करावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यावेळी प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
पावसाळा पूर्व कामे पूर्ण करावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्या, पूरपरिस्थितीत मदतकार्य आणि नागरी आरोग्याच्या तक्रारींबाबत महापालिका प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नालेसफाई, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांना सक्षमपणे पायाभूत सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने कार्यक्षमपणे काम करावे, अशा सूचना केल्या आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.