दिनेश सोनवणे
दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव व कडेठाण येथील रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे .
कडेठाण व कानगाव या ठिकाणी सद्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे . परंतु या भुयारी मार्गात सतत पाणी साचत आहे .यामुळे येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे असल्याचे आमदार राहुल कुल हिवाळी अधिवेशनात मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना आ. कुल म्हणाले की, केंद्र शासनाच्या सुवर्ण चतुर्भुज योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने सुवर्ण चतुर्भुज आणि डायगोनल स्कीमवरील सर्व मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी आधीच संमती दिली आहे.
सदर योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील कडेठाण व कानगाव येथील रेल्वे क्रॉसिंग वर रेल्वे चे भुयारी मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. परंतु या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि नाजिक असलेल्या कालवा फाट्यामुळे या भुयारी मार्गमध्ये सतत पाणी साचते व ते बाहेर पडू शकत नाही.
विशेषत पावसाळ्यात असे दिसून आले आहे की या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याने बराच काळ हा भुयारी मार्ग कार्यान्वित होऊ शकत नाही. आणि भुयारी मार्ग पाण्याने भरला असल्याने गेले २ वर्ष होऊन ही उर्वरित काम पूर्ण झालेले नाही तेव्हा कडेठाण व पाटस रेल्वे स्टेशन येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डानपुल उभारण्यात यावा अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेमध्ये केली आहे