राजगुरुनगर: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांची, तर उपसभापती पदी क्रांती संदीप सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांचा, तर उपसभापती पदासाठी क्रांती संदीप सोमवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी शिदे व सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभापती व उपसभापती पदाच्या निवडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तालुक्यातील सर्व पक्षीय विरोधकांनी सत्ता काबीज केली.
सभापती, उपसभापती यांच्या निवडीच्या घोषणेनंतर शिंदे, सोमवंशी समर्थक आणि आमदार मोहिते पाटील विरोधकांनी बाजार समिती आवारात मोठा जल्लोष केला. आमदार दिलीप मोहिते पाटील समर्थक असलेल्या समितीचे मावळते सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर २८ सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती. मात्र, आमदार मोहिते पाटील यांच्या तीन समर्थकांनी बंडखोरी करून विरोधकांना साथ देण्याचे ठरवले. दहा विरोधात आठ संचालक झाले, विरोधी दहा संचालक अज्ञातस्थळी सहलीला गेले.
संचालक विरोधात गेल्याने पणन मंत्रालयाद्वारे आमदार मोहिते पाटील यांनी २८ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीला अगोदरच्या सायंकाळी स्थगिती मिळवली होती. यावरून विरोधक त्यावेळी तोंडघशी पडले होते. त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक लावली. वादाच्या पार्श्वभूमीवर आणि तापलेल्या राजकीय वातावरणात निवडणूक होणार असल्याने बाजार समिती आवारात १२ अधिकारी आणि १०० पोलिस असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
आमदार मोहिते पाटील यांच्या विरोधात तयारीत असलेले विधानसभा इच्छुक, त्यांचे समर्थक आणि तालुक्यातील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, तनुजा घनवट, अनिल बाबा राक्षे, मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार, अशोक खांडेभराड, संजय घनवट, अमर शिंदे, नितीन गोरे, महेश शेवकरी यांच्यासह अनेकांनी निवडणूक प्रक्रियेपूर्वीच्या राजकीय डावपेचात यशस्वी सहभाग घेतला.
सभागृहात होणारी हुकुमशाही या निवडणुकीने मोडीत काढली आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेत शेतकरी हिताचे निर्णय यापुढे घेण्याला प्राधान्य देऊ, असे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी निवडीनंतर सांगितले. संचालक अशोक राक्षे, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद, सागर मुझे, सुधीर भोमाळे, माणिक गोरे, महेंद्र गोरे, सयाजी मोहिते यावेळी सभागृहात उपस्थित होते.
दरम्यान सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीवर आम्ही सर्व संचालकांनी बहिष्कार घातला आहे. त्याचे कारण म्हणजे या राजीनाम्यावर व या निवडणुकीवर १४ तारखेला सर्वोच्च न्यायालयात निकाल देण्यात येणार आहे. आम्ही २-३ संचालकांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांना रीतसर पत्र दिले आहे की, आम्ही या निवडणुकीसाठी सहमत नाही. अनेकजण म्हणतात, सभापती यांचा राजीनामा झालेला आहे. परंतु, ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. राजीनामा झाल्यावर त्यावर चर्चा होऊन प्रोसेडींग होऊन तो मंजुरीसाठी पाठवला जातो. परंतु, राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही किंवा प्रोसेडिंग न होता तो मंजुर केला आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिभोरे यांनी सांगितले.