सागर जगदाळे / भिगवण : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी बलाढ्य प्रतिस्पर्धी उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना सहज चितपट करून ऐतिहासिक हॅट्रिक केली आहे. त्यांच्या विजयाचे अनेक पैलू आहेत. यात प्रामुख्याने सतत लोकांच्या संपर्कात राहणे व जनसामान्यांमध्ये त्यांची सहज असणारी उपलब्धता हेच त्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे आवर्जून सांगितले जाते.
आमदार दत्तात्रय भरणे हे 2014 पासून इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु आमदार भरणे हे कधीही पोलिसांच्या गराड्यात वावरताना जनतेला दिसले नाहीत. ते विना पोलिस संरक्षण अगदी सहजपणे मतदार संघात फिरत असतात. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे हे पोलीस संरक्षण नसलेले महाराष्ट्रातील कदाचित एकमेव आमदार असावेत.
आताही आमदार झाल्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना दोन शस्त्रधारी अंगरक्षक पुरवण्यात आले होते. परंतु त्यांनी पुन्हा एकदा पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण इंदापूर तालुका हेच माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबामध्ये वावरताना मला कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज भासत नाही. तसेच माझी मायबाप जनताच माझे सुरक्षा कवच असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले आहे.