पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील वडगावशेरी आणि हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाले आहेत. या दोन्ही आमदारांना उमेदवारी मिळाल्याने हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबतच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीबरोबर सत्तेमध्ये आहे. महायुतीच्या जागावाटपानुसार विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार, हे निश्चित समजले जात होते. त्यानुसार या दोन्ही विद्यमान आमदारांना एबी फॉर्म मिळाले आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर टिंगरे यांनी जगदीश मुळीक यांचा, तर चेतन तुपे यांनी योगेश टिळेकरांचा पराभव केला होता. मात्र, राजकीय समीकरणे बदलल्यानंतर योगेश टिळेकर यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर, माजी आमदार जगदीश मुळीक हे लोकसभेला इच्छुक होते. मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही. विधानसभेला वडगावशेरी हा महायुतीमध्ये भाजपला मिळणार,
अशी शक्यता होती. मात्र, अजित पवार यांनी वडगावशेरी आणि हडपसर हे दोन्ही मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. हे मतदारसंघ मिळत असताना वडगावशेरीऐवजी खडकवासला अजित पवार घेणार, अशी चर्चा होती.
दरम्यान, पोर्शे कार घटना प्रकरणानंतर टिंगरे यांना उमेदवारी मिळणार का? यावर चर्चा होत असताना त्यांना एबी फॉर्म मिळाला आहे. तर, तुपे हे शरद पवार गटात जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात असताना त्यांनाही एबी फॉर्म मिळाला आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर आता हे दोघे अर्ज कधी भरणार, याबाबत उत्सुकता आहे.