पुणे: पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चांगलंच फैलावर घेतले. एका परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागल्याचा प्रकार समोर आले आहे. या रुग्णांची प्रकृती अधिक खालावली असल्याची बाब आमदार जगताप यांना समजताच त्यांनी औंध जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली. हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित परिचारिका आणि डॉक्टरला चांगलेच खडसावले.
कोणत्या ना कोणत्या कारणांवरून औंध जिल्हा रुग्णालय हे नेहमीच चर्चेत असते. या रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी थेट चिंचवडच्या आमदार आश्विनी जगताप यांच्याकडे आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांना परिचारिकेच्या चुकीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्या दोघांची प्रकृती अधिकच खालावली होती. यामधील एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह तर दुसऱ्याला ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त चढवायचे होते. रक्त चढवणारी परिचारिका फोनवर बोलत असल्याने नेमकं झालं उलट. ‘ए’ वाल्या रुग्णाला ‘बी’ आणि ‘बी’ वाल्याला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आले. यामुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती अधिकच बिघडली.
त्यानंतर रुग्णांना थेट आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले. याबाबतची माहिती आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी रुग्णांची विचारपूस करण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांच्या नातेवाईकांसमोर डॉक्टरांना बोलवून घेऊन चांगलेच खडसावले. तसेच संबंधित परिचारिकेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले.