पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर मतदरसंघाचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी तुफान टोलेबाजी करत शिरूरचे आमदार अशोक पवार यांना चांगलाच दमच भरला होता. पठ्ठ्या आता तू आमदार कसा होतो तेच मी बघतो असे म्हणत आमदार पवार यांना अजित पवारांनी इशारा दिला होता. आता, अजित पवारांच्या टीकेला आमदार अशोक पवारांनी जशास तसं उत्तर देत पलटवार केला आहे.
शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांना साथ का दिली? यावर भाष्य केलं. “दिलीप वळसे पाटील यांचा शपथविधी झाला की, या गड्याची सटकली. हा माझ्याकडे येत म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं यांच्याबरोबर काही जमणार नाही, असे त्यांनी त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना सांगितले. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या पहिले सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला मोठं गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला पवार साहेबांनी सांगितले आहे की, पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहे. पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची आणि बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता तू मंत्री व्हायला निघाला आहेस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो हेच बघतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले होते. यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारेंनाही अजित दादांनी असाच दम दिला होता. त्यानंतर, विधानसभेच्या निवडणुकीत विजय शिवतारे पराभूत झाल्याने आमदार होऊ शकले नाहीत. त्यानंतर, आता त्याचप्रमाणे अजित पवारांनी शरद पवार यांच्या पक्षातील आमदार अशोक पवार यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले आमदार अशोक पवार?
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले की, मी एक छोटा कार्यकर्ता असून मी अजित पवारांबद्दल काही बोलू शकत नाही. उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी अशी दमबाजीची भाषा वापरणे त्यांना शोभा देत नाही. आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने थकित कर्ज भरून देखील नवीन कर्ज मिळाले नाही. कर्ज न मिळाल्याने कारखाना बंद पडला. राज्यातील इतर कारखान्यांना कर्ज मिळाले, केवळ आमच्याच कारखान्यांना कर्ज का मिळाले नाही? असा प्रश्नआमदार अशोक पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मी माझ्या कॉलेज जीवनापासून शरद पवार यांचा चाहता आहे. त्यामुळेच, मी शरद पवारांना सोडून जाणार नाही. तसेच मी आमदार व्हायचं की नाही हे शरद पवार आणि शिरूरची जनता ठरवेल, बाकी कोणी ठरवू शकत नाही, असा जोरदार पलटवार अशोक पवार यांनी अजित पवारांवर केला आहे.