उरुळी कांचन, (पुणे) : गेल्या पाच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणाची पूर्ण खिचडी झाल्याने ही विधानसभा निवडणूक व्यक्ती केंद्रित झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील विकासाचे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी नसून ते थेट दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. विकासापेक्षा गट-तट आणि व्यक्तीकडे निवडणूक झुकल्याचे दिसत आहे. यामध्ये शिरूर-हवेली मतदारसंघ देखील अपवाद नाही.
शिरूर-हवेलीमधून विद्यमान आमदार अशोक पवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार, हे निश्चित आहे. परंतु, महाविकास आघाडीचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीमधून उमेदवारी नक्की कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी झाली. 22 ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
त्यानुसार शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींनी देखील वेग घेतला आहे. 2019 आणि 2024 च्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये फुट पडल्यानंतर कोण कोणत्या पक्षात आहे? याबाबत असलेली साशंकता आजपर्यंत देखील दूर झालेली दिसत नाही. त्यामुळे शिरूर-हवेली विधानसभेचे चित्र कसे असणार, याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या मतसंघात कोण कोणाच्या विरोधात आणि कोणत्या पक्षाकडून लढणार? मैदान कोण मारणार आणि छुपे रुस्तम कोण? याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती समोरासमोर उभे ठाकणार असले, तरी दोघांना यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे. शिरूर व हवेलीमध्ये निवडणूक लढवणारा उमेदवार हा आपल्या भागातीलच उमेदवार असावा, यासाठी सोशल मिडीयावर जोरदार प्रचार मोहीम उघडण्यात आली आहे.
सध्याच्या अस्थिर राजकारणाच्या काळात काहीही घडू शकते, याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. यामुळे अनेकांना ऐनवेळी बदल होऊ शकतो अशी आशा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या समोर महायुतीने मोठे आव्हान उभे केल्याने त्यांना धोका निर्माण झाल्याचे वातावरण तयार झाले होते. मात्र, शिरूर – हवेली विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याने त्यांच्याकडून सक्षम दावेदार कोण, असा प्रश्न उभा राहिल्याचे चित्र आहे. त्याचवेळी आमदार अशोक पवार यांची उमेदवारी पक्की असल्याने त्यांनी विरोधी उमेदवार कोण असणार? याची वाट न बघता प्रचाराला सुरुवात केली आहे.
दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके हे विधानसभा निवडणुकीसाठी तयार असून ते कोणत्या पक्षांकडून की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार, हे अद्याप समोर आलेले नाही. या निवडणुकीत ते काय निर्णय घेणार? याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. दरम्यान महायुतीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या विश्वासाने माऊली आबा जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. कटके हे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आयात उमेदवार नको, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या
नुकतीच शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. काही झाले, तरी अन्य पक्षातील इच्छुक उमेदवार आयात करू नये, असे पत्र देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदर पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अजित दादा काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.