रवी पाटील
MLA Ashok Pawar : शिक्रापूर, (पुणे) : शिरूर तालुक्यात सर्वाधिक वेगाने वाढते नागरीकरण शिक्रापूर गावाचे होत असून, या गावाच्या सक्षम विकासासाठी या ठिकाणी नगरपरिषद होण्याची गरज आहे. शिक्रापूरला नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी आपण शासन दरबारी आग्रही भूमिका घेणार असल्याची ग्वाही शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.
सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी
शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ४० लाख रुपयांच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच आबासाहेब करंजे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी सरपंच रमेश गडदे, समता परिषदेचे ज्येष्ठ नेते सोमनाथ भुजबळ, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब सासवडे, रमेश थोरात, पूजा भुजबळ, सीमा लांडे, त्रिनयन कळमकर, वंदना भुजबळ हे ग्रामपंचायत सदस्य, तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. आर. राठोड, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, बाळासाहेब वाबळे, काळूराम वाबळे, विठ्ठल सोंडे, रावसाहेब करंजे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतच्या वतीने मुरळ ओढ्याच्या सुशोभीकरणाचे होत असलेल्या कामाचे कौतुक आमदार पवार यांनी करतानाच यासाठी लागणाऱ्या वाढीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले. यावेळी लांडे – ताजणे वस्तीचा रस्ता, लवार्डे पुनर्वसन ते राऊतवाडी रस्ता, मोती चौक ते जकाते चाळ रस्ता, आणि मराठे कॉलनीतील अंतर्गत रस्ता या कामांचे भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले.
यापुढे बोलताना पवार म्हणाले, ” शिक्रापूरच्या विकास कामांसाठी गेल्या चार वर्षाच्या कालावधीत आपण सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या गावचे वाढते नागरीकरण लक्षात घेता ग्रामपंचायतीला विकासकामे करताना अनेक मर्यादा पडत आहेत. या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना झाल्यास राज्य व केंद्र सरकारकडून भरीव निधी विकास कामांसाठी मिळू शकतो. शिक्रापूरला नगरपरिषद व्हावी याबाबतचा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे यापूर्वीच दिला असून, या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत शासनाकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, उपस्थितांचे स्वागत उपसरपंच मोहिनी संतोष मांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे यांनी केले, तर सर्वांचे आभार ग्रामपंचायत सदस्या सारिका सासवडे यांनी मानले.