लोणी काळभोर : मालगाडीच्या टपावरून रेल्वे लाईन ओलांडताना विद्युत तारांना चिकटून एमआयटीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी (ता. हवेली) स्थानकात गुरुवारी (ता.२५) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पार्थ विठ्ठल दहिफळे (वय-२०, सध्या, रा. हडपसर, पुणे, मूळ रा, पावडेवाडी रोड, कोणार्क विहार, फरांदे नगर, वाडी बुद्रुक-नांदेड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ दहिफळे हा लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संकुलात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो त्याच्या हडपसर येथील मामाकडे राहण्यास आहे. पार्थ हा गुरुवारी (ता.२५) सकाळी विद्यालयात आला होता. त्यानंतर साडेचार वाजता कॉलेज सुटल्यानंतर घरी निघाला होता. त्यावेळी लोणी स्टेशनमध्ये मालगाडी थांबली होती.
दरम्यान, थांबलेल्या मालगाडीच्या टपावरून रेल्वे लाईन ओलांडून जाऊ असा त्याने विचार केला. तो मालगाडीच्या टपावर चढल्यानंतर २५ हजार केव्हीच्या इलेक्ट्रिक वायरला चिकटला असता जोराचा झटका लागून खाली कोसळला. यावेळी खूप मोठा बार झाला. या बारचा आवाज ऐकून लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस आर घुले, रेल्वे पोलीस अनिल केदार, श्रीनिवास वाघमारे आदी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.
लोहमार्ग पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पार्थला तातडीने लोणी काळभोर येथील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी पार्थचा जागीच मृत्यू झाल्याची घोषणा केली.
जिन्याचा वापर केला असता तर वाचला असता जीव
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासनाने लोणी रेल्वे स्थानकावर पायऱ्यांचा जिना (दादर) बांधलेला आहे. रेल्वे लाईन ओलांडताना प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यायचा असतो. मात्र, पार्थने जिन्यावरून चढून जाण्यासाठी कंटाळा केला आणि रेल्वे लाईन मालगाडीच्या टपावरून ओलांडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे लाईन ओलांडताना तारेला चिकटून त्याचा जागीच मृत्यू झाला. पार्थने पायऱ्यांचा वापर केला असता, तर त्याचा जीव वाचला असता