पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे शनिवारी (ता. ३०) व रविवारी (ता. ३१) सायंकाळी ६.१५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस साजऱ्या होणार्या या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन डेहराडूनच्या तिबेटियन होम स्कूलचे डेव्हिड कालसांग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्या या संगीत महोत्सवामध्ये मारिया लिन ओब्रे, निसर्ग पाटील, सुप्रसिद्ध पखवाज वादक पं. उद्धवबापू आपेगावकर, शास्त्रीय गायिका डॉ. श्रेयसी पावगी हे आपली कला सादर करतील.
प्रख्यात ध्रुपद संगीत गायक सुप्रियो माईत्रो, सुप्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये, कल्याणी बोंद्रे आणि सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भट हे ३१ डिसेंबर रोजी आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने होईल.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खऱ्या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतु, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरुण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खऱ्या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
विश्वशांती गुरुकुल येथील विश्वराज बंधाऱ्याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिर स्वरूपी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचांवरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १ जानेवारी २०२४ रोजी सुरू होणार्या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येचा समारोप ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२४ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नाद-ब्रह्म-स्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांतरसाची अनुभूती’ घ्यावी असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका ज्योती कराड-ढाकणे आणि महासचिव आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.