लोणी काळभोर, (पुणे) : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे विश्वशांती गुरुकुल, विश्वराजबाग, लोणी काळभोर, येथील विश्वराज बंधार्याच्या परिसरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधूर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, विश्वशांती कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, सौ. मंगेशकर, प्रा. स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. डॉ. सुनीता मंगेश कराड व मुकेश शर्मा उपस्थित होते.
३१ डिसेंबर रोजी झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर ,विकार, विकृती व विकल्पसारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२३ वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततने पार पाडवे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्या अर्थान भारतीय अस्मिता जागविण्याच्या हा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत.”
“भारतीय संगीत हे जीवाचा एक भाग आहे. त्यामुळे जीवन हे सूरमय व तालमय व्हावे. ज्ञान कर्म आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने संगीत शिकावे. आजच्या युवकांनी पाश्चात्य संगीताबरोबरच भारतीय संगीत शिकणे गरजेचे आहे.” या वेळी पं. तेजस उपाध्ये, गायिका सुवर्णा माटेगावकर, प्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे व सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भट यांनी आपली कला सादर केली. आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण व सूत्रसंचालन केले.