लोणी काळभोर : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभाग, अॅडव्हेंचर क्लब आणि काफीला अॅडव्हेंचर्स या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानासाठी (एनएमबीए) सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा नजिक असणाऱ्या भिरा गावात एकदिवसीय ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील तरुणाईने मादक द्रव्यांचे सेवन न करता वन पर्यटनाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राखले पाहिजे, असा संदेश देण्याचा उद्देश या ट्रेकच्या आयोजनामागे होता. या ट्रेकमध्ये विद्यापीठाच्या 80 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत केवळ वनविहार न करता भिरा गावातील ट्रेकिंग मार्गावर पडलेला कचरा गोळा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सुरज भोयार यांच्या नेतृत्वाखाली व लोणी-काळभोर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने भारत सरकारच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियान मोहिमेला बळकटी देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी, काही दिवसांपूर्वी विद्यापीठाचे रोईंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी काढण्यात आली होती. ज्यात विद्यापीठाच्या असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
काही दिवसांत शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात युवकांकडून अमली पदार्थांचे सेवन वाढल्याच्या बातम्या वृत्तपत्रात वाचण्यात आल्या. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ्यांच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी व त्यासाठी मन ट्रेक सारख्या साहसी क्रीडा प्रकारांकडे वळविण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड हे देखील त्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे या उपक्रमातून सर्व युवकांना आम्ही ट्रेकिंगसारखे छंद जोपासण्याचे आवाहन करीत आहोत.
– डॉ. सुराज भोयार, सहाय्यक संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग