लोणी काळभोर : ‘विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२४’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबागच्या (पुणे) खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल २० सुवर्ण व १७ रौप्यपदकांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ‘एमआयटी एडीटी’ पाठोपाठ ‘एमआयटी डब्लूपीयू’ संघाने एकूण १६ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा तर ‘बीजेएस वाघोली’ संघाने ३ सुवर्ण व २ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.
राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, साईचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु व कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या स्पर्धेत १५ क्रीडा प्रकारांत १४० हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
बॅडमिंटनच्या महिला व पुरुष प्रकारांच्या अंतिम सामन्यात ‘एमआयटी एडीटी’च्या खेळाडूंचा पराभव करत कोथरूडच्या ‘एमआयटी डब्लूपीयू’ने सुवर्ण कामगिरी केली. बुद्धिबळातील ‘एमआयटी डब्लूपीयू’चा वरचष्मा पहायला मिळाला. कारण पुरुषांत त्यांनी ‘व्हीआयटी’चा तर महिलांत ‘एमआयटी एडीटी’चा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यांतही ‘डब्लूपीयू’ संघाने मुंबईच्या ‘एसएमएमके’ संघाचा ५७-४१ अशा फरकाने धुव्वा उडवला तर महिलांत ‘डब्लूपीयू’ने ‘एमआयटी एडीटी’चा ५२-४६ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदकासोबत नेले.
स्पर्धेत सर्वांत रोमांचक ठरलेल्या व एकूण ३६ संघांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यजमान ‘एमआयटी एडीटी’च्या पुरुष संघाने पटकाविले. यात वेदांत कनोजीयाला सर्वोत्कृष्ट फलंदाज तर स्वामाभू स्वामीला सर्वोत्तम गोलंदाजाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात ‘एनडीए’ खडकवासलाने संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरला ५-२ अशा फरकाने पराभूत केले. तर महिलांत ‘एमआयटी डब्लूपीयू’ने ‘एमआयटी एडीटी’ संघाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला.
कबड्डीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती व एमईएस गरवारे महाविद्यालय, पुणे यांनी जेतेपद पटकाविले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या खो-खोच्या अंतिम सामन्यात गणपतराव काळभोर महाविद्यालय व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाने सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेच्या अन्य टेबल-टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल व वॉटर पोलो या खेळांतही ‘एमआयटी’ शिक्षण समुहांच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण सर्वांत तरुण महिला एव्हरेस्टवीर पुर्णा मालवत, मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू कॅप्टन राजेंद्र शेळके, ‘एमआयटी एडीटी मिटकॉम’च्या संचालिका डॉ. सुनिता कराड, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार आदी पाहुण्यांच्या हजेरीत पार पडले.
तिरंदाजीत श्रुती गव्हाणे, साक्षी बदडेला ‘सुवर्ण’
संत ज्ञानेश्वर विश्वशांती डोमच्या लॉनवर कंपाउंड व इंडियन बो प्रकाराचे तिरंदाजी सामने पार पडले. कंपाउंट पुरुषांत डी. वाय. पाटील पिंपरीच्या निखील वासेकर याने तर महिलांत ‘एमआयटी एडीटी’च्या श्रुती गव्हाने हिने सुवर्णपदकाचा वेध घेतला. तर इंडियन बो प्रकारात ‘एमआयटी एडीटी’ बायो इंजिनिअरिंगच्या साक्षी बदडेने महिलांत तर ‘पीसीसीओई’च्या शुभम गांगुर्डे याने पुरुषांत सुवर्ण कामगिरी केली.
रोईंगमध्ये योगेश, स्नेहाची सुवर्ण कामगिरी
विद्यापीठाच्या बोट क्लबवर पार पडलेल्या विविध गटांच्या इनडोअर रोईंग स्पर्धेच्या पुरुष व महिला सिंगल स्कल प्रकारात ‘एमआयटी एडीटी’च्या योगेश बोराले व स्नेहा सोळंखी यांनी १:१९.०६ व १:५५,०२ या वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर यासह डबल स्कल प्रकारात १:३२.६ वेळेसह तर ३-ईमध्ये १:३५.३ व मिक्स प्रकारात १:४४.७ अशा वेळेसह ‘एमआयटी एडीटी’ बोट क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना वर्चस्व राखले.
बॉक्सिंगध्ये ‘एमआयटी एडीटी’चेच वर्चस्व
बॉक्सिंक कोर्टमध्ये पार पडलेल्या विविध वजनी गटांच्या सामन्यांत यजमान ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचेच वर्चस्व पाहायला मिळाले. ‘एमआयटी एडीटी’च्या शुभम कार्ले याने फ्लाय वेट, अब्बास तांबोळीने हेवी वेट तर ओमकार जामदाडे याने सुपर हेवीवेट गटात बहारदार कामगिरी करताना सुवर्ण ठोसा लगावला. या सर्व खेळाडूंना ऑलिंपियन बॉक्सर मनोज पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.