लोणी काळभोर : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेडल ऑपरेडेट वॉशिंग मशिनला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व स्रिजान या उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित ‘डीपेक्स-२०२४’ या राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाचा किताब आपल्या नावावर केला.
‘डिपेक्स २०२४’ या स्पर्धेसाठी राज्यभरातून १ हजारांहून अधिक प्रकल्पांनी सादरीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यातील केवळ ३०० प्रकल्पांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली. ज्यामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे विद्यार्थी अनुराग निकम, युगंत पाटील, विनायक गोयल व मयूर माळी यांनी तयार केलेल्या पेडलच्या सहाय्याने चालणाऱ्या वॉशिंग मशिनने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दुसरा क्रमांक पटकाविला.
यासाठी त्यांचा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाला प्रा. अजयकुमार उगले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्पाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, मशीन पोर्टेबल, इको-फ्रेंडली आहे. कपडे धुण्यासोबतच शारीरिक तंदुरुस्तीसाठी मदत करते. त्यामुळे क्रीडा संकुल, लष्कर आदी ठिकाणी या मशिनचा चांगला वापर केला जाऊ शकतो.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, प्रा. डॉ. विरेंद्र शेटे, डॉ. सुदर्शन सानप यांनी कौतुक केले आहे.