पुणे : पुण्यातील कोथरूड भागातून हरवलेल्या विराज फड या 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हयू पॉइंट दरीत आढळून आला आहे. शनिवारी (दि.30) रोजी रात्री रेस्क्यू टीम आणि पोलीसांना या तरुणाचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराज ईश्वर फड (वय-18, रा. कोथरुड, पुणे) हा तरुण हरवल्याची तक्रार पुणे पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली होती. विराज बेपत्ता असल्याची तक्रार सोमवारीच पुणे पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. गुरुवारी 28 तारखेला ताम्हिणी घाटात देवकुंड व्ह्यू पॉइंट येथे काही पर्यटक भटकंतीसाठी आले होते. त्यावेळेस त्यांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग दिसली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल आणि कपडे सापडले. यासंदर्भातील माहिती प्लस व्हॅली हॉटेलमध्ये देऊन पर्यटक निघून गेले.
माहिती मिळताच मुळशी पोलीस ठाण्यातील अधिकारी महेश पवार यांनी बंद मोबाईल सुरु केला. तेव्हा हा मोबाईल विराजचा असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर शोध कार्याला गती मिळाली. बऱ्याच तासांनंतर विराजचा मृतदेह रेस्क्यू टीमला सापडला. दरीमध्ये एका झाडाखाली विराजचा मृतदेह आढळून आला. या शोध मोहिमेमध्ये शेलार मामा रेस्क्यू टीमनेही पोलिसांना मदत केली. विराजचा शोध घेण्यासाठी ड्रोनबरोबरच आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. या प्रकरणामधील पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.