पुणे : शहरात वाहनांची जाळपोळ, मोडतोड, परवाना नसताना वाहन चालविण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानुसार पालकांवर गुन्हे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. धुळवड साजरी करताना बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले. वाहन परवाना नसताना दुचाकी चालविल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळवडीला होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर भागात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी दोन मुले भरधाव वेगाने दुचाकीवरुन निघाली होती. पोलिसांनी नाकाबंदीत त्यांना अडवले. चौकशीत त्यांच्याकडे वाहन परवान्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दुचाकी जप्त केली, तसेच त्यांचे पालक आणि दुचाकी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुलांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करण्यात येऊ नये. तसे केल्यास संबंधित दुचाकींची नोंदणी एक वर्षासाठी रद्द करण्यात यावी, असे पत्र पोलिसांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे.
दरम्यान, पोलिसांनी पालकांना देखील आव्हान केले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्यासाठी देऊ नये. वाहन परवाना नसल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करुन वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिला आहे.