पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. १० वर्षाच्या मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अविनाश पवार (रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आणि मतिमंद असल्याची माहिती होती. असं असताना देखील तिला दमदाटी करुन घराच्या बाजूला असलेल्या जिन्या खाली घेऊन जात त्याठिकाणी आरोपीने तिच्या सोबत अश्लील वर्तन केले. त्यावेळी मुलीने या प्रकरारा विरोध केला असता आरोपीने तिच्या डोक्यात बुक्की मारुन तिला खाली पाडले. त्यावेळी घराजवळ राहणाऱ्या एका मुलाने हा प्रकार पाहिला आणि आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने घाबरून त्या ठिकाणाहून पळ काढला.
सर्व शांत झाल्यानंतर आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आला आणि पीडित मुलीला अश्लील शिवीगाळ करुन याबाबत कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. तसेच तिला मारहाण करुन पळून गेला. हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करीत आहेत.