पुणे : पुण्यातील एका तरुणीला ऑनलाइन गेमच्या बहाण्याने बिहार येथील एक तरुण मैत्री करून त्रास देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका महाविद्यालयीन तरुणास मार्केट यार्ड पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. अमनकुमार पंकज तांटी (वय २०, रा. हरपूर, जि. बेगुसराई, बिहार) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. बालकांचे लैंंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही फ्री फायर ऑनलाइन गेम खेळत होती. यावेळी तिची आरोपी अमनकुमार या तरुणाशी ओळख झाली. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अमनकुमारने तिला जाळ्यात ओढले. एका दिवशी अल्पवयीन मुलीला धमकावून तिची छायाचित्रे मागवून घेतली. मुलीने त्याला छायाचित्रे पाठविल्यानंतर त्याने तिला धमकी देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासामुळे अखेर मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली.
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी अमनकुमार हा चार मोबाइल क्रमांक वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्याचा पत्ताही पोलिसांना मिळाला नव्हता. तांत्रिक तपासात आरोपी बिहारमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, किशोर पोटे, अमित जाधव, धनश्री गोफणे यांचे पथक थेट बिहारमध्ये गेले. पोलिसांनी वेशांतर करून आरोपी अमनकुमारला ताब्यात घेतलं.