पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांसह इतर चौघांनी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असं म्हणत एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या शिक्षिकेच्या पतीने आणि आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने तसेच जन्मदात्या बापानेही मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी नराधम पित्यासह ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हि घटना चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल ते २९ जून २०२४ या कालावधीमध्ये घडली आहे.
याप्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीने गुरुवारी ५ जुलैला चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून समाधान लवटे (वय-४०), प्रताप प्रमोद धायतडे, नितीन हराळे (वय-३२, तिघे रा. चिखली), सागर हराळे (वय-२०, रा. मोहननगर, आकुर्डी) आणि पीडीत मुलीचे वडील यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पित्यासह समाधान लवटे, प्रताप धायतडे, सागर हराळे, नितीन हराळे यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही युट्युबवर व्हिडीओ पाहत असताना त्याठिकाणी समाधान लवटे आला आणि आपणही त्या व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असं म्हणत तिला त्याच्या घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितले, त्यावेळी वडिलांनी सांगितले कि, याबाबत कोणाला काही सांगू नको, आपली इज्जत जाईल. त्यानंतर पीडित मुलगी आजारी असल्याने घरात झोपली असता तिच्या वडिलांनी देखील जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडित मुलगी ट्युशनसाठी तिच्या शिक्षिकेच्या घरी गेली आसता, तेव्हा घरात कोणी नसताना शिक्षिकेच्या पतीने देखील मिळालेल्या संधीचा फायदा उचलत मुलीवर जबरदस्ती केली. त्यानंतर १९ मे रोजी पीडित मुलीच्या आईच्या मैत्रिणीच्या दिराने देखील गैरकृत्य केले. त्यावेळी तो म्हणाला, तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करीन, असे बोलून तिच्यावर लैगिक अत्याचार केला. तसेच त्यानंतर २ जून रोजी मुलगी आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता मैत्रिणीच्या पतीने गैरकृत्य कले. त्यानंतर २९ जून रोजी रात्री तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले.
अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (दि. ५) नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, जन्मदात्या बापाकडूनच तसेच ओळखीच्या व्यक्तींकडून सुरू असलेले अत्याचार, जबरदस्ती सहन न झाल्याने मुलीने शाळेतून थेट चिखली पोलिस ठाणे गाठून हा सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या पित्यासह इतर संशयितांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.