हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉस्पिटल मध्ये जेवणाचा डब्बा देऊन निघालेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोघांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता. १6) संध्याकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास काळुबाई मंदिराजवळ रिक्षा स्टॉप परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सागर सुनील हरगुडे, (वय- ३७) आणि भूषण प्रकाश कटारे, (वय २८, रा. दोघेही २०३, सहकार कॉलनी, साडे सतरा नळी, तुपे बंगल्याजवळ, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातेवाईकांवर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फिर्यादी हे गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात जेवणाचा डबा देऊन पुन्हा काळुबाई मंदिराजवळ रिक्षा स्टॉप येथे रिक्षाने आले होते. यावेळी भूषण कटारे याने त्यांना त्यांच्याजवळ बोलावले त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असताना भूषण कटारे आणि सागर हरगुडे यांनी फिर्यादीचा रस्ता अडवला.
यावेळी भूषण कटारे व सागर सुनील हरगुडे याने फिर्यादीला अडवले. यावेळी फिर्यादी यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादी यांचे तोंड दाबले व विनयभंग केला. तसेच शनिवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांची आई दोघेही सागर हरगुडे यांच्या आई वडिलांना सागरच्या कृत्याबाबत सांगायला गेले असता सागर हरगुडे यांनी पुन्हा शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भूषण कटारे व सागर सुनील हरगुडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.