पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात बलात्काराची तक्रार दिल्याचा रागातून पाच जणांच्या टोळक्याने तक्रारदार यांच्या लहान भावाला आणि बहिणीला दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर, अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन सुरीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना २० फेब्रुवारीला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भिमपुरा कॅम्प येथे घडली आहे.
याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून लष्कर पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अलसबा जावेद शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख आणि एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. भिमपुरा कॅम्प, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्व आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी अलसबा शेख हिचा भाऊ आफान शेख विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींनी संगनमत करुन मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात घुसले.
आरोपींनी फिर्यादी यांची लहान बहिण, लहान भाऊ आणि मोठ्या भावाला शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण देखील केली. आरोपी जावेद शेख याने फिर्यादी यांच्या लहान अल्पवयीन बहिणीला खाली पाडून तिच्यासोबत गैरवर्तन तसेच सुरीच्या उलट्या बाजूने मारण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक मनिषा वलसे करत आहेत.