पुणे : इंन्स्टाग्राम ग्रुपवर अश्लील चाटिंगचे मेसेज करुन १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून क्लासला जाताना तिचा पाठलाग करुन शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १० जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या सुमारास खांदवे नगर आणि उबाळेनगर परिसरात घडला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सार्थक सातव याच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्राम ग्रुपवर पिडीत मुलीबद्दल अश्लील मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पिडीत मुलगी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास उबाळेनगर येथे कॉलेजला जात होती. त्यावेळी तिच्याकडे आरोपींनी रागाने पाहून अश्लील शिवीगाळ केली.
त्यानंतर अल्पवयीन मुलगी दुपारी खराडी येथे क्लासला निघाली होती. त्यावेळी आरोपींनी चारचाकी गाडीतून तिचा पाठलाग करत गाडी आडवी मारुन पिडीतेला रस्त्यात अडवले. अल्पवयीन मुलाने तिला अश्लील शिवीगाळ करुन तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.