पुणे: देशी बनावटीचे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला स्वारगेट पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त केली. गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत येथे कमरेला पिस्टल लावलेला संशयित उभा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाव घेत संशयिताला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याच्याकडे कमरेला देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, प्रशांत टोणपे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, दीपक खेंदाड, हनुमंत दुधे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.